Sunday 18 February 2018

प्लॅस्टिकचे प्रकार (Types of Plastic)

ॲज युजुअल..बबन व सन्या टपरीवर बसलेले होते. लेक्चर वगैरेची त्यांच्या भाषेत ‘गिरणी’ चालू होती. हातात केवळ सर्वांना कॉलेजला जातो याचा पुरावा दिसावा म्हणून धरलेली एक वही बबन्याने टेबलावर ठेवली होती. नुकतेच एक कटिंग संपलेले होते. वडापाव तळल्याचा खमंग वास घमघमत होता. बबन्याला जाम कंट्रोल होइना..तो टपरीवाल्याला म्हणाला..

“ओ अन्ना, दो वडा पाव जल्दी..चटणी पण द्या..पाव ताजाय ना?”

अन्नाने दोन प्लेट वडापाव आणून दिला. बबन्याने आधाशासारखा वडापाव खाल्ला व समोरच्या प्लास्टिकच्या जगातलं पाणी प्यायला त्याने तो जग उचलला व जे व्हायला नको होतं तेच झालं. पाण्याच्या जगला चीर गेली होती व त्यातून पाणी टेबलावर सांडलं.

“अरे ए येड्या बबन्या, अरे जगला क्रॅक गेलाय दिसलं नाही का क्रॅक डोक्याच्या..”

“जगाला क्रॅक गेलाय? कधी? मला नाही दिसला सन्या? पण असा क्रॅक जाण्याइतकं काय झालं?”

“अरे प्लास्टिकचा जग आहे तो बबन..क्रॅक जाणारच..प्लास्टिकला तडे जाणार नाहीतर काय लोखंडाला?”

“अरे पण जगाला क्रॅक गेलाच कसा सनी? चांगलं प्लास्टिक घेतलं नसणार या अन्नाने..घेतलं असेल स्वस्तातलं..”

“बसका आता बबन..स्वस्त व महागाचं प्लास्टिक असं काय वेगळं असतं? अन्नाने काय मुद्दाम तडेवालं प्लास्टिक घेतलं असेल?”

“सनीभाई, हे बघ..प्लास्टिकचे अनेक प्रकार असतात त्यातील घटकद्रव्यांनुसार..खरंतर सात प्रकार असतात ..पॉलिइथिलीन टेरिप्थालेट(Polyethylene Terephthalate or PET or PETE), दाट पॉलिइथिलीन (High density Polyethylene or HDPE), पॉलिविनाइल क्लोरईड (Polyvinyl chloride or PVC), पातळ पॉलिइथिलीन (Low density Polyethylene or LDPE), पॉलिप्रोपिलिन (Polypropylene), पॉलिस्टिरीन (Polystyrene) व इतर प्रकार  ..( http://www.the-warren.org/GCSERevision/resistantmaterials/plastics.html)”

“अरे बबन्या स्कॉलर, उगीच शायनिंग मारू नकोस समजलं ना..तू हे सांग की यांना बनवतात कसं..म्हणजे यातलं कुठलं प्लास्टिक कसं बनतं ते सांग..”

“सन्या, तसं बघायचं तर बनवण्याच्या दृष्टीने प्लास्टिकचे दोन प्रकार असतात..उष्णतेने वारंवार बदलता येऊ शकणारे प्लास्टिक्स (Thermo Plastics) व एकदा उष्णतेने घडले की पुन्हा आकार न बदलू शकणारे प्लास्टिक्स (Thermosetting Plastics or Thermosets ).



“अरे बबन, हे सारखे आकार बदलाणारे प्लास्टिक म्हणजे दरपिच्चरला नवीन रोल करणाऱ्या हिरो-हिरोईन सारखे वाटतात..हेअरस्टाईल बदलेल, डोळ्यात कलरलेन्स घालेल, आधी विलन..आता हिरो..आधी बाजीराव मग लगेच दुसऱ्या पिच्चरमध्ये खिल्जी..पण अक्षयकुमार बघ..प्रत्येक रोलमध्ये देशभक्तच..फायटरच..एकदम थर्मो प्लास्टिकच..पण..मला सांग मगाशी जे स्कॉलरसारखे बोललास..सात नावे सांगितलीस प्लास्टिकची..त्यातले कुठले सारखे बदलणारे आहेत व कोणते ‘एक बार बन गया तो बन गया’ या टाईपचे आहेत?”

“सनीभाई, पॉलिअमाइड, पॉलिकार्बोनेट, पॉलिस्टर, पॉलिइथिलीन, पॉलिप्रॉपिलिन, पॉलिस्टिरीन, पॉलियुरेथिन, पॉलिविनिल क्लोराइड, पॉलिविनिलिडिन क्लोराइड व एक्रोलोनायट्राइल ब्युटाडिन स्टायरीन हे नेहमीच्या वापरातले प्लास्टिक आहेत..”

“बबन्या, अरे पण ते दाट व पातळ की काय ते कुठे गेले?”

“ओह, अरे PET, HDPE LDPE हे पोलिइथिलिन चेच प्रकार आहेत..”

“अरे बबन्या, जरा माणसासारखे बोल रे..हे प्रकार आणि त्यांचे उपयोग यांबद्दल सांग जरा रे..नाहीतर हे सगळे परग्रहावचरचे प्राणीच वाटतायत..”

“ बर सनी. तुझ्यासाठी कायपण. प्लास्टिकची नावे व उपयोग पुढील प्रमाणे

नाव
संक्षिप्त नाव
उपयोग
पॉलिअमाइड
PA
धागे, टूथब्रशचा ब्रश, नळ्या, मासेमारीची जाळी, कमीशक्तीचे मशीनचे भाग
पॉलिकार्बोनेट
PC
CD, चष्म्याच्या काचा, ट्रफिक दिवे, लेन्स
पॉलिस्टर
PES
धागे, कपडे
पॉलिइथिलीन
PE
सुपरमार्केटमधील पिशव्या, प्लास्टिक बाटल्या

HDPE
डिटर्जंट बाटली, दुधाचे जग, प्लास्टिक केस

LDPE
बाहेरचे फर्निचर, फ्लोअर टाईल, शॉवर पडदा

PET
कार्बिनेटेड ड्रिंक्स बाटल्या, प्लास्टिक फिल्म, मायक्रोवेव पॅकेजिंग
पॉलिप्रॉपिलिन
PP
बाटलीचे झाकण, पिण्याचे स्ट्रॉ, योगर्टचे डबे, उपकरणे, कार बंपर, प्लास्टिक प्रेशर पाईप
पॉलिस्टिरीन
PS
खाण्याचे डबे, टेबलवेअर, वापरायचे व फेकून द्यायचे कप, प्लेट
पॉलियुरेथिन
PU
कारचे कोटिंग्ज व ग्लास फिल्म
पॉलिविनिल क्लोराइड
PVC
प्लंबिंग पाइप, खिडकीच्या फ्रेम, फ्लोरिंग
पॉलिविनिलिडिन क्लोराइड
PVDC
खाद्यपदार्थाचे पॅक्स
एक्रोलोनायट्राइल ब्युटाडिन स्टायरीन
ABS
कॉम्प्युटर मॉनिटर, प्रिंटर, कळफलक यांच्या केसेस

“वारे बबन्या..पण मग यातले दोन प्रकार कोणते आहेत..ते बदलणारे व न बदलणारे?”

“छान प्रश्न. एक्रॅलिक, पॉलिप्रोपिलिन, पॉलिस्टिरीन, पॉलिथिन व पॉलिविनिल क्लोराइड हे पहिल्या प्रकारातले म्हणजे वारंवार बदलू शकणारे प्लास्टिक आहेत. दुसऱ्या बाजूला मेलामाइन, बॅकेलाइट, पॉलिस्टर व एपॉक्सि रेसिन्स हे दुसऱ्या प्रकारचे म्हणजे एकदा घडले की पुन्हा न बदलणारे प्लास्टिक्स आहेत. ”



“अरे बबन, एवढं लेक्चर मारलंस..पण मूळ विषय बाजुलाच राहिला. या पाण्याच्या जगला क्रॅसा गेला हे नाहीच सांगितलंस..बहुतेक तुला माहितच नसणार..उगीच गप्पा मारतोस झालं..”

“अरे तसं नाही सनी..हे प्लास्टिक कसं बनलं यावर आणि तो क्रॅक कुठे गेला हे पाहिलं तर आपल्याला ठरवता येईल”..असं म्हणून बबन तो जग नीट पाहू लागला. तेवढ्यात कॅन्टिनच्या वेटराने बिल आणून दिलं..

“ए गणपत..बिल काय आणतोस..मी प्लास्टिकचा अभ्यास करतोय दिसत नाही का?” बबन्या म्हणाला.

त्याचं उत्तर ऐकून गल्ल्यावरचा अण्णाशेट म्हणाला “ए पोरहो. साला सकाळपासून बसलाय इथे टाईमपास करत..तुम्ही काय स्टडी करनार माहिताय मला..चला निघा इथून..मी जेवायला चाललो घरी. दुकान बंद करायचंय मला. चला निघा.”

धिप्पाड, निब्बर अण्णासमोर सनी व बबन्याने काहीही न बोलता बिलाचे पैसे ठेवले व ते निघून गेले. त्यांना माहिती होतं की अण्णाच्या हाती सापडलो तर चेहऱ्याचा रंग काही वेळाकरता तरी बदलेल. त्यापेक्षा गेलेलं बरं.


“बबन्या आता निघू. पण हे प्लास्टिकचं डिस्कशन पुढे होणार म्हणजे होणार..”

बाय करता करता सनी म्हणाला..

(क्रमश:)

1 comment:

  1. खूप छान पद्धत आहे हा विषय जाणून घेण्याची !👍

    ReplyDelete